Saturday, March 14, 2009

आपली आवड मध्ये सर्वांचे स्वागत...

नमस्कार,
'आपली आवड' ब्लॉग सुरु करुन जवळजवळ आता १ वर्षाहून जास्ती दिवस झाले. मुळात कल्पना अशी होती की मला आवडणारी गाणी अथवा कविता ह्याविषयी लिहावे. अर्थात माझ्यासकट सर्वाना माहिती होतच की माझा आळस मध्ये येणार. तर आता ते सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मी सुरवात करीत आहे.

मराठी भाषेचा मला अभिमान आहे. मला माझ्या मराठी असण्याचा अभिमान आहे. अमृतातेही पैजा जिंके अश्या ह्या मराठीत इतरत्र कुठेही जायला लागू नयेत इतके साहित्याचे भंडार आहे. ह्या साहित्यालांकारांचा वापर मराठी चित्रपट कर्त्यानी आणि संगीतकारांनी पुरेपूर केला आणि मराठी रसिकांपुढे एकापेक्षा एक कृती सादर केल्या. अर्थात मराठी रसिकांनीहि त्याना भरभरून साद दिली. त्यातून मिळाला जन्मानुजन्मे पुरेल असा चित्रपट आणि संगीताचा खजिना. खेद एवढाच वाटतो, की गेल्या काही वर्षात ह्या खजिन्यात भर पडायची कमी झाली आहे. तेच ते संगीतकार किती करू शकणार? मेलेडी, शब्द, सूर आणि आवाज ह्यांचा बसलेला मेळ घेऊन मराठी रसिकांपर्यन्त तो पोहचवणारे नविन संगीतकार आहेत कुठे? जे आहेत ते नवीन वा जुनी गाणी पूर्वीच्याच साच्यामध्ये बद्ध करीत आहेत किंवा दुसरा प्रकार म्हणजे, आधी चाल बसवून त्यात शब्द बसवले जात आहेत. (हा दुसरा प्रकार तर नवीन मराठी चित्रपटात सर्रास वापरला जातोय. कधीकधी तर गाणं मराठी आहे की इंग्लीश आहे की हिंदी आहे हा प्रश्न पडावा इतक्या ब्रम्ह्घोटाळ्याप्रमाणे तयार केली आहेत. ठर्रेमे जॉनी वॉकर मिक्स करके सँत्रेवाली के साथ पियेंगा ना तर ऐसाच कुछ होयेंगा ना और क्या?)

मी एवढा मोठा नाही की हे पूर्णपणे बदलू शकेन. पण मला हे पण माहिती आहे की मी जर फ़क्त ह्याबद्दल तक्रार करीत राहिलो तर तेहि योग्य नाही. आणि म्हणूनच एक छोटा प्रयत्न माझ्याकडून करून बघतोय. पसंत पडला तर दाद द्या. तर सुरवातीला पहिल्यावहिल्या प्रयत्नात काय करतोय की एक कविता घेतोय आणि तिला मला जमेल त्याप्रमाणे गाण्यापर्यन्त घेऊन जाणार आहे। वाटेत जे अनुभव येतील ते सर्वा ह्या ब्लॉग वरती लिहीत जाईन. सर्वप्रथम सांगून ठेवलं तर बरं पडेल की मी संगीतकार नाही. मला फक्त संगीताची आणि शब्दांचीआवड आहे. त्या आवडीतुनच तयार झालेली ही - 'आपली आवड'!!

पहिली कविता निवडतोय - "गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे". कवी आहेत "चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू)". पं. हृदयनाथ मंगेशकरानी स्वरबद्ध केलेले हे गाणे म्हणलंय आशा भोसले ह्यांनी.
दुसरा भाग लवकरच लिहीन. तोपर्यंत - धन्यवाद!

No comments:

Post a Comment